फुलं
सकाळ सुंदर होती. प्रसन्न, ताजी, नवी, टवटवीत. पक्ष्यांची किलबिल, थंड हवा, निरवता पण सजीवता, दंवात भिजलेली, हसरी, मोहमयी, हिरवी हिरवी. मी अंगणात आले. कोपऱ्यातलं एक झाड कसं आळस झटकून ताजं ताजंतवानं झाल्यासारखं हसत होतं…
इतक्यात माझं लक्ष गेलं. हेच ते गृहस्थ. गेले काही दिवस आमच्या झाडांची फुलं गुपचूप काढून नेत असतात. नेहमी ते लवकर येतात. मी त्यावेळी आमच्या बेडरूमच्या खिडकीतून बागेकडे बघत असे. आज मात्र त्यांना थोडा उशीर झाला होता आणि मी थोडी लवकर उठून बागेत माझ्या आवडत्या जागी बसायला आले होते. मी पटकन थोडी आड बाजूला गेले. ते गृहस्थ, बहुतेक त्यांनी मला बघितलं नसेल, पुढे आले. आमच्या कुंपणाच्या पलिकडे गेलेल्या फांद्यांवरची फुलं तोडू लागले. मला त्यांचा अतीशय राग आला.
"का हो, आमच्या झाडाची फुलं तोडायचा तुम्हाला कोणी अधिकार दिला?"
मी एकदम पुढे जाऊन जोरात म्हटलं. ते दचकले. गांगरले. अपराधी भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटला. पण मला ते घाबरलेले मात्र वाटले नाहीत. मला म्हणाले,
" माफ करा. मला फुलं चोरून नेण्याची इच्छा नव्हती. खरं सांगायचं तर इतक्या दिवसात तुमच्या घरी कुणी रहातं का नाही हेच मला माहिती नव्हतं. नेहमी सगळ्या खिडक्या बंद असतात.
मी आज पहिल्यांदाच तुम्हाला पाहिलं. त्यामुळे विचारणार तरी कुणाला?"
ह्या अनपेक्षित उत्तराने मलाही क्षणभर काय बोलायचं ते सुचेना. मग आपली बाजू पडू द्यायची नाही म्हणून मी म्हटलं,
"अहो, आम्हाला तुम्ही बघितलं नाही म्हणून ती फुलं तुम्ही न्यायची असा त्याचा अर्थ होतो का? ही बाग सांभाळायला, जपायला आम्हालाही कष्ट पडतात. माळ्याला पैसे द्यावे लागतात. बागेची देखभाल करावी लागते. आणि एवढं करून त्या फुलांचा उपभोग आम्हाला घेता आला नाही तर काय उपयोग?"
"तुमचं बरोबर आहे.मी फुलं तोडली ही माझी चूक झाली. खरं सांगू का? मी रोज इथून फिरायला जात असे. ह्या झाडावरची फुलं बघून ती आपल्या देवासाठी न्यावी आणि त्याला सजवावे असं मला फार वाटे, पण कुणाला न विचारता फुलं न्यावी हे माझ्या मनाला पटत नव्हतं. मी समोरच्या बाकावर बसून त्या फुलांचा आनंद घेत असे. खरोखरच तुमची बाग फार सुंदर आहे. काही दिवसांनी माझ्या मनात आलं, ज्या अर्थी संध्याकाळीसुद्धा ती फुलं त्या झाडावरच कोमेजलेल्या स्थितीत असतात त्याअर्थी ती फुलं कुणी तोडत नसावी म्हणजे बंगल्यात कुणी रहात नसेल. शिवाय ती फुलं झाडावरच कोमेजली काय किंवा माझ्या देवाला सजवल्यावर देवाजवळ ती कोमेजून गेली काय तसं म्हटलं तर दोन्ही सारखंच. त्या निर्माल्याचे मी घरीच खत बनवतो. म्हणून मी ती फुल तोडून घ्यायला लागलो पण मी कधी तुमच्या बागेच्या आत शिरलो नाही. तुमचं फाटक उघडून मला त्या बागेत सहज येता आलं असतं. बागेच्या आतली फुलंसुद्धा मला तोडून नेता आली असती. तसं मी कधी केलं नाही. माफ करा मला. मी आता पुन्हा नाही फुलं तोडणार."
त्यांच्या बोलण्यात मनापासून दिलगिरी व्यक्त केलेली मला जाणवली. मला त्यांच्या बोलण्यात प्रामाणिकपणा दिसला खरोखरच सज्जन वाटत होते ते. मी त्यांना म्हटलं,
"ठीक आहे. यापुढे मात्र नका फुलं तोडत जाऊ. झाडावरून ती तोडून देवाच्या पायी वाहण्यात तरी काय अर्थ आहे? ती देवाची निर्मिती आहे. झाडाची अपत्य असतात ती. त्यांच्या आईपासून त्यांना तोडण्यात आणि देवाच्या पायावर वाहण्यात कसला आला आहे आनंद?"
त्यांचा चेहरा जरा पडला.
"ठीक आहे.आता नाही तोडणार."
असं म्हणून ते निघून गेले.
मी घरात गेले. झाल्या घटनेबद्दल माझ्या मनातला विचार जाईना. त्या माणसाचा चेहरा सारखा नजरेसमोर येऊ लागला. वाटलं,
'तसं म्हटलं तर त्यांची काय चूक आहे ती ताजी टवटवीत फुलं देवाच्या पायी वहावी असं वाटलं तर? त्यांचंही बरोबर आहे.
मी स्वत: कधी झाडाची फुले तोडत नाही. ती त्या झाडाची मुलं आहेत असं मला वाटतं. तरी त्या गृहस्थांची भावना माझ्या भावनेइतकीच प्रामाणिक आहे असं मला सारखं वाटू लागलं.
चहा घेतांना माझ्या मुलांना आणि नवऱ्याला मी सकाळचा प्रसंग सांगितला.
मला आलेल्या बेचैनीबद्दलही सांगितलं.
"त्यात एवढं बेचैन होण्यासारखं काय आहे? बाग आपली आहे. आपण तिची काळजी घेतो. तो कुठला कोण म्हातारा. त्याला काय अधिकार आहे आपल्या बागेतली फुलं तोडायचा? मी असतो
तर त्याला चांगला लेफ्ट अँड राईट घेतला असता."
मुलगा म्हणाला
"खरं आहे. मी तर त्याला हाकलवूनंच दिल असतं. तो म्हातारा आहे म्हणून काय त्याने आपली फुलं तोडायची? एवढं असेल तर त्यांनी विकत घेऊन फुलं वहावी की देवाला!"
मुलगी म्हणाली.
मला मुलांचं म्हणणं पटत होतं आणि नव्हतंही. माझ्या नवऱ्याने यतीनने मात्र काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
रात्री उशीरा घरी येऊनसुद्धा झोपताना आपण होऊनच विषय काढून यतीन मला म्हणाला,
" त्यांनी न विचारता फुलं तोडणं हे गैरच आहे. तरीसुद्धा त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण पटण्यासारखं आहे. मी तुला फक्त एवढंच सांगेन, तुला एखादी गोष्ट आवडली नाही की तू एकदम तीव्र स्वरात तुझी प्रतिक्रिया देतेस. तसं करत जाऊ नकोस. दुसऱ्याला अपमानित वाटतं. बोलायचं तेच, पण सौम्य स्वरात. हे आता तुला जमायला हवं.
उद्या तुला जावई, सून येतील. त्यांचं सगळंच वागणं तुला पटेल असं नाही. म्हणून आत्तापासून आपली नाराजी सौम्यपणे व्यक्त करायला शिक."
यतीनचं मत ऐकून मी बेचैन झाले. उद्या ते गृहस्थ दिसले तर त्यांच्याशी नीट बोलून माझी बोलताना चूक झाली, हे त्यांना सांगायचं मी ठरवलं.
दुसऱ्या दिवशी लवकर उठून मी नकळतच त्यांची वाट बघत बागेत बसले; पण ते मला दिसले नाहीत. त्यानंतरही बरेच दिवस ते मला दिसले नाहीत. खरंतर मी त्यांना विसरूनही गेले असते. यतीनने माझ्याबद्दल जे मत व्यक्त केलं होतं त्यातून त्याची तीव्र नाराजी माझ्या लक्षात आली होती. तेच त्याने मला लग्न झाल्यापासून मधून मधून सांगितलं होतं. तो स्वतः कुणाशी कधी आवाज चढवून बोलत नसे. सहसा माझ्या चुका काढून बोलण्याचा त्याचा स्वभाव नव्हता. खरंतर त्या नाराजीनेच माझ्या आवश्यकतेपेक्षा तिखट प्रतिक्रियेची जाणीव मला करून दिली होती.
महिना सव्वा महिना झाला आता मलाही हळूहळू त्या गृहस्थांचा विसर पडू लागला होता. अचानक एकदा मला ते कोपर्यावरच्या वाण्याच्या दुकानात दिसले. त्यांची आणि माझी नजरानजर झाली. त्यांनी मला बहुतेक ओळखलं नसेल पण मीच हसले. त्यांना म्हटलं,
"आज बऱ्याच दिवसांनी दिसलात."
ते गोंधळून थोडा वेळ माझ्याकडे बघत राहिले. आणि मग एकदम त्यांना ओळख पटली असावी.
"हां हां. आता ओळखलं मी. कशा आहात?"
ते आपलं काहीतरी बोलायचं म्हणून बोलले.
"मी बरी आहे. आय एम सॉरी. मी तुमच्याशी त्या दिवशी जास्तच तीव्रतेने माझी नाराजी प्रकट करून बोलले. मी तुमच्याशी तसं बोलायला नको होतं. तुम्ही माझ्यापेक्षा वयाने बरेच मोठे आहात. आय एम रियली सॉरी."
मी म्हटलं.
ते म्हणाले,
"तुमचं बरोबर आहे. माझी चूक झाली होतीच. सोडून द्या तो विषय."
ते अगदी मनापासून बोलत होते असं मला जाणवलं. त्यांच्या चेहऱ्यावरचा शांतपणा मला आश्वासित करून गेला.
मी हसले. म्हटलं,
"तुम्ही महिनाभर दिसला नाहीत."
ते म्हणाले,
"हो. मी इथे नव्हतो. मी पंढरपूरला गेलो होतो."
"तुम्ही वारीला जाता?"
मी आश्चर्याने विचारलं.
"हो. देवदर्शनाला नाही, तिथे काही कामासाठी जातो."
ते म्हणाले.
बोलत बोलत आम्ही दोघं आमच्या घरापाशी आलो. "आत चला ना, कॉफी घेऊन निघा."
मी त्यांना म्हटलं.
"नको नको. मी येईन परत कधीतरी."
ते म्हणाले.
तेवढ्यात फाटकाजवळ आलेला यतीन त्यांना पाहून एकदम आनंदाने म्हणाला,
"अरे,सर, तुम्ही? या ना. या. अलभ्य लाभ! तुम्ही इथे कसे?"
"अरे, तू?"
असं ते म्हणत आहेत तो यतीनने त्यांना प्रेमाने जवळजवळ मिठीच मारली. त्यांनाही येथील ला पाहून फार आनंद झालेला दिसला.
यतीनने त्यांना सोडलंच नाही. ते घरात येऊन बसले. त्यांच्या गप्पांतून मला कळलं की ते टेल्को कंपनीतून जनरल मॅनेजरच्या पोस्टवरून रिटायर झाले होते. बिझिनेस सुरू करण्यापूर्वी यतीन बावीस वर्ष टेल्को मध्येच होता. त्याचा टेल्को मधील इंटरव्यू ह्यांनीच घेतला होता. त्या दोघांनी दीड वर्ष एका टीममध्ये काम केलं होतं. ते, श्रीयुत मराठे, यतीनचे टेल्कोमधील गुरूच होते म्हणाना! मग त्यांच्या सामायिक ओळखी निघाल्या. त्या दोघांच्या गप्पा रंगल्या.
ते घरी गेल्यावर यतीन मला म्हणाला की ते कंपनीतर्फे बरीच वर्ष परदेशात होते. त्यानंतर हैदराबादचं कंपनीचं युनिट त्यांनीच सुरू केलं होतं. कंपनीतर्फे बंगला, बंगल्याभोवती बाग, माळी सगळं काही होतं. सेवानिवृत्त झाल्यावरसुद्धा त्यांनी एक बंगला विकत घेतला होता. त्याच्याभोवतीही सुंदर बाग होती. माळी होता. तोपर्यंत येतील अधून मधून त्यांच्या संपर्कात होता त्यानंतर मात्र गेली आठ दहा वर्ष त्यांचा यतीनशी संपर्क राहिला नव्हता.
आता ऐंशीच्या पुढे वय गेल्यावर बंगल्याचा व्याप सांभाळणं कठीण जात असल्यामुळे त्यांनी बंगला विकून एक ब्लॉक विकत घेतला होता. तिथे मात्र त्यांच्या बायकोने कुंडीमध्ये झाडे लावायला त्यांना स्पष्ट नकार दिला होता. झाडं जमिनीत जशी वाढतात तितक्या जोमाने कुंडीत वाढत नाहीत हे त्यांनासुद्धा पटलं होतं.
"मी रोज पूजा करताना देवाला तरतर्हेची ताजी फुलं वाहून सजवतो. पूजेपेक्षा की सजावट देवाला सौंदर्य देते. विकत घेतलेली फुलं काही झालं तरी तितकी ताजी मिळत नाहीत. त्यामुळे अविचाराने तुमच्या बागेतली फुले तोडण्याचा मोह मला आवरला नाही. तुम्ही मला बोललात त्यामुळे मी केवढी मोठी चूक करत होतो हे माझ्या लक्षात आलं."
एकदा गप्पा मारताना ते प्रांजळपणे म्हणाले. मला मात्र मेल्याहून मेल्यासारखं झालं.
आता आमची अगदी चांगली मैत्री झाली होती. ते माझे मराठेकाका झाले होते. आमचं वरच्यावर एकमेकांच्याकडे जाणं-येणं सुरू झालं. मराठेकाका उत्तम पेंटिंग करत. त्यांचं घर फार कलात्मकतेने सजवलं होतं म्हणजे केवळ पैशाच्या दृष्टीने नाही तर त्यांची कलात्मक नजर त्याला कारणीभूत असावी हे मला जाणवत होतं. काकूही अगदी मनमिळाऊ होत्या.
एकदा मी काकांना विचारलं,
"तुम्ही दर वर्षी वारीला जाता हे कसं काय?त्या लोकांबरोबर रहाणं तुम्हाला कसं जमतं?"
ते म्हणाले,
अहो, माझा जन्म पंढरपूरचाच आहे. माझे वडील कधीही देवळात जात नसत. ते आमच्या घरातल्याच देवाची पूजा करत. देवाला सजवत नटवत त्याच्याशी गप्पा मारत. ते डॉक्टर होते. वारीला आलेला कुठलाही मनुष्य आजारी पडला तर ते त्याला विनामूल्य औषध पाणी करत. आमच्या घरी ठेवून घेत. ते म्हणत,
' देवाचं दर्शन घेण्यापेक्षा ह्या वारकऱ्यांना औषध पाणी करणं अधिक महत्त्वाचं आहे.'
आता माझे दोन डॉक्टर मित्र आणि आम्ही दोघं पंढरपूरला वारकरी पोहोचण्याआधी पाच-सहा दिवस जातो. आमचं घर अजून आहे तिथे. माझे दोन डॉक्टर मित्र वारकऱ्यांचं दुखणं-बाणं बघतात. त्यांच्या उपचाराचा लागणारा खर्च मी करतो, म्हणजे परमेश्वराने मला जे दिलं आहे त्यातील काही भाग त्याच्या भक्तांसाठी खर्च करण्याची शक्ती आणि इच्छा देवानेच मला दिली आहे."
ते ऐकून मी थक्क झाले.
मनात आलं, वारकरी देवावर भार टाकून ऊन पावसाची पर्वा न करता वारीला जातात, तो देव अशाच माणसांच्या रूपात त्यांना मदत करत असेल.
माणसाची ओळख होत गेली की त्याच्या जीवनाचे वेगवेगळे पैलू लक्षात येत जातात. माझा काकांबद्दलचा आदर दुणावला. मराठे काकांच्या रूपात माझी एका अलौकिक व्यक्तिमत्त्वाशी ओळख झाली होती.
निवेदिता रिसबूड.
9769555758
Comments
Post a Comment