मराठी भाषेचे लडिवाळ लेणे:कोल्हापूरी शिव्या
कोल्हापूरकरांना शिवीचे कौतुक नाही कारण कोल्हापुरात कुणाच्याही तोंडी या दोन शिव्या नक्की असतात एक म्हणजे रांडच्या व दुसरी च्यायला. आता इथे एक आहे ज्यांना अश्लील अश्लील म्हणून नाक मुरडायचे असतील त्याने हा लेख वाचण्याच्या फंदातच पडू नये. पण मला खात्री आहे सच्चा कोल्हापूरकर हा लेख चवीने वाचणार याची.
खरंतर शिवी ही अचानक तोंडातून जाणारी गोष्ट आहे. कारण तुम्ही नीट व सावकाश तेही डावीकडून गाडी चालवत आहात व विरुद्ध बाजूने एखादा सुसाटत आला आणि तुमच्या आडवी गाडी घातली, तर ब्रेक तर तुम्ही दाबताच, पण त्याच क्षणी तुमच्याही न कळत तुमच्या तोंडून शिवी बाहेर पडते. ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे, कारण तुम्ही तुमचा राग कमीत कमी शब्दात समोरच्या माणसावर काढलेला असतो .तोही कोल्हापुरी असला तर त्याची परतफेड नक्कीच करतो. त्यामुळे असे खूप प्रसंग मराठी साहित्यात जागोजागी आढळतात जिथे कोल्हापूर आणि शिव्या यांचा संबंध दाखवला गेला आहे. पण इथे असेच नाही, तर महाराष्ट्रात इतरत्रही ,अगदी विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातही, इरसाल सदाशिव पेठी किंवा नारायण पेठी शिव्या पुणेकर यथेच्छ पणे वापरतात. आधी याची साहित्यातील उदाहरणे घेऊ.
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांची चित्रपट क्षेत्रातील कामगिरी कोल्हापूरच्या मंगल स्टुडिओ पासून सुरू झाली असे म्हणायला हरकत नाही. या संस्थेतर्फे त्यांनी आठ ते दहा चित्रपट भूमिकेच्या रूपात केलेच, परंतु इतर विविध क्षेत्रातही त्यांची चित्रपटातील कामगिरी अगदी धगधगीत आहे. पहिला उल्लेख आहे व्यक्ती आणि वल्ली मधील. नामू परीट या लेखात ते म्हणतात, एकदा नामू कपडे न्यायला घरी आल्यावर त्याने सांगितले, "साहेब कुळकरणी मेला." "कशाने ?"असे पुलनी विचारल्यावर," त्याला मानेमाच्या यष्ट्रातील कमलने फशिवलं," असं सांगून, कपड्याचा गठ्ठा आवळता आवळता, गंगावेशच्या आसपासची एक फर्मास शिवी नामूने हासडली व गठ्ठा आवळला. म्हणजे कोल्हापुरातील गंगावेस ही शिवी साठी किती प्रसिद्ध होते याचा हा स्वच्छ पुरावा. दुसरे म्हणजे कोल्हापुरातील पुलंचे मित्र व मराठीतील नामवंत दिग्दर्शक, राम गबाळे यांच्याबरोबर त्यांनी खूप काम केले व त्यांच्या बरोबरचा हा जिव्हाळा त्यांनी शेवटपर्यंत राखला. शेवटी शेवटी सुद्धा, 'राम आला' म्हटल्यानंतर सुनीताबाई रामला पुलंच्या खोलीत सोडून यायच्या व पुल त्याला दार बंद करण्यास सांगायचे व म्हणायचे," राम, पहिल्यांदा मला कोल्हापुरी शिव्या ऐकव ",व पाच दहा मिनिटे मनसोक्त शिव्या ऐकल्यावर दार उघडले जायचे. मग तिथे सुनिताबाईना प्रवेश असायचा. हे त्यांनाही माहिती होते. यानंतर त्यांच्या रावसाहेब या लेखात, पुल व रावसाहेब यांची पहिली भेट कशी झाली त्याचा उल्लेख आहे. पुल सांगतात," मी कोल्हापुरात रेकॉर्डिंग रूममधे गेलो .तिथे विष्णुपंत जोग यांच्या गायकी गाण्याचे रेकॉर्डिंग होणार होते. रेकॉर्डिंग सुरू झाले व जोगांचा वरचा षड्ज ठ्या लागला व तो षड्ज व आर्केस्ट्रा याला भेदून रावसाहेबांची दाद गेली," हाण तिच्या आयला,". ही सणसणीत दाद ऐकल्यावर बाळ गजबर यांनी पुलंची व रावसासाहेबांची रीतसर ओळख करून दिली. रावसाहेबांच्या लेखात तर जागोजागी शिव्यांची पखरन आहे. धैर्यधर गायकी अंगाने," या नवनवल नयनोत्सवा" म्हणू लागल्यावर पद संपल्यावर रावसाहेब पुलना घेऊन रंगपटात गेले व त्या धैर्यधराला न भूतो न भविष्यती अशा इरसाल शिव्या ऐकवल्या." तुमचं बाप लावलं होतं का हो चाल? ते मूळ चाल बदलायचं काय कारण होतं?" असं म्हणल्यावर धैर्यधर म्हणाला," दीनानाथ मंगेशकरनी बदलली नाही का चाल ?"त्यावर रावसाहेब म्हणाले," त्यांचं अधिकार होतं हो , तुमचं नरडं एरंडेल गळल्यागत गुळूमुळू स्वर त्यातून येतात .दीनानाथांची एक तान घ्या व तुम्हाला मूळव्याध होतं का नाही सांगा, उगंच जमत नाही तर उंटाच्या बुडाचा मुका घ्यायला जातो कशाला रे तू?"असे रावसाहेबांच्या लेखात जागोजागी उल्लेख आहेत. एका ठिकाणी त्यांनी दिलेल्या शिव्याxxx टाकून दिलेल्या नाहीत व कंसात लिहिले आहे, तबीयतदार तज्ञांनी फुल्यांची जागा भरून काढावी. हीच गोष्ट वसंतराव देशपांडे यांच्यावरील लेखात आहे . वसंतराव देशपांडे या आपल्या लेखात पुल म्हणतात, "एकदा मी चुकून चिंतामणराव देशमुख यांच्यापुढे बोलून गेलो," वसंतराव म्युनिसीपाल्टी कार माधवराव जोशांची नक्कल उत्तम करतात." व मग जीभ चावली. वसंतरावांनी माधवराव जोशी यांची नक्कल त्यांच्या इरसाल शिव्यांसह चिंतामण रावांसमोर पेश केली. ती ऐकल्यावर चिंतामणराव आधी डोळ्यातून पाणी येई तोपर्यंत हसले व मग म्हणाले," माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शिव्या आज पहिल्यांदा तुमच्या तोंडून ऐकल्या व म्हणाले ,"वडिलांची व माधवराव जोशी यांची नक्कल तुम्ही उत्कृष्ट केली." पुल पुढे लिहितात, मराठी भाषेचे हे लेणे चिंतामणरावांच्या समोर मांडण्याचे धाडस आजवर कोणी केले नसेल. अशी ही पुलंच्या साहित्यातील काही उदाहरणे. 'अडला हरी' या लेखात हरी काळूस्कर बद्दल लिहिताना पुल सांगतात,आण्णा निमकराच्या हाॅटेलमधे डझनभर प्लेटी मिसळ व चहा घेतल्यावर ,काउंटर जवळ गेल्यानंतर हरी ओरडला," माझे पाकीट मारले." त्याबरोबर आण्णा निमकरानी हऱ्याची मुंडी काउंटरवर दाबून धरली व बोकडाच्या मानेवर सुरी फिरवताना मंत्रोच्चार करतात, तशी शिव्यांची लाखोली वाहिली व आण्णा निमकरानी सगळ्या चंदनवाडीला ऐकू जाईल अशा आवाजात हऱ्याच्या दिवंगत मातोश्रींविषयी विशेष आपुलकीची भाषा वापरून हऱ्याची मुंडी काउंटरवर चेपून धरली. अखेर आण्णा निमकरांची जीभ
थकली व हात वळून आला व त्यांचा मुंडी वरचा हात ढिला झाला.
कोल्हापूरच्या फिल्म इंडस्ट्रीत असताना, रेकॉर्डिंग तज्ञ ,आप्पासाहेब जाधव यांच्याबरोबर पुलंचा असाच जिव्हाळा होता. त्यांच्यावर त्यांनी महाराष्ट्र टाइम्स मध्ये लेख लिहिला होता. त्या लेखात आप्पासाहेब जाधव, मी ,राम देशपांडे, शरद तळवलकर असे गप्पा मारत असताना, त्यादिवशी रामचा मूड नव्हता म्हणून पुलनी विचारले ,"काय झाले रे राम्या, आज तुझा मूड दिसत नाही, काही काळजीत आहेस असं दिसतं." त्यावर राम देशपांडे म्हणाले," अरे, पोरग्याच्या शाळेत हेडमास्तरांनी बोलवून घेतले होते व पालक म्हणून मला ऐकवले, "तुमचा मुलगा अतिशय घाणेरड्या शिव्या देतो त्याला आवरा म्हणून, म्हणून काळजीत आहे. कुठून असल्या घाणेरड्या शिव्या शिकून येतो देवास ठाऊक." राम एवढे बोलल्यावर सर्वजण हसू लागले व पुल शेवटी म्हणाले," अरे राम्या, तू एवढा शिव्यांच्या विद्यापीठाचा कुलगुरू घरात असताना पोरग्याला दुसरीकडून शिव्या शिकायची गरजच काय!" हे लक्षात आल्यानंतर रामसह सगळे जोरात हसले. त्यावेळी वडिलांना काळजीत टाकणारा हा पोरगा आता माझा दोस्त आहे. तो म्हणजे विनोद देशपांडे. आमच्या खणीवर पोहायला येणाऱ्या ग्रुपपैकी याचं वैशिष्ट्य असं ,लहान असताना वडिलांना काळजीत टाकणारा हा पोरगा आपल्या मित्रांना बोलावताना, म्हणजे आमचा जवळपास आठ दहा जणांचा ग्रुप आहे, त्याना बोलावताना, कुणालाही बिंदिक्कतपणे चार चौघात हाक मारतो,"ए रांडच्या, इकडे ये."हे ऐकल्यावर, मी म्हणालो," अरे विनोद, तू नेमका कुठल्या रांडच्याला बोलावतोस, त्याला कसं कळणार ?"त्यावर त्याचे उत्तर मासले वाईक होते. "प्रत्येकाला बोलावताना या शिवीचा उच्चार मी वेगळ्या पद्धतीने करतो .त्यावरनं त्या रांडच्याला बरोबर कळतं की, हा आपल्याला बोलावतो आहे ते". याला म्हणतात शिव्यावर मास्टरी.
एकदा असेच खणीवर सकाळी मी पोहायला चार-पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर गेल्यावर, आमच्या पांडबा मिस्त्रीनी लडिवाळपणे विचारपूस केली," काय रे, ***, कुठे आला नाहीस चार दिवस ,कुठे गेला होतास रे फोकळीच्या?" मी इकडे तिकडे पाहिले, महाराष्ट्र टाइम्सचे, कोल्हापूरचे कित्येक वर्षाचे बातमीदार, विलासराव झुंजारही तिथेच उभे होते. मी त्यांना म्हणालो," बघा किती प्रेमाने विचारपूस करतात हे मित्र." त्यावर विलासराव म्हणाले,"तांबट ,अहो हे मौखिक वांग्मय आहे, जे एका तोंडातून निघून दुसऱ्या तोंडी जाते. त्यामुळे जशी गुरुमुखातून विद्या हाशील करावी लागते त्याप्रमाणे शिव्या ह्या एका तोंडातून दुसऱ्या तोंडात अशा शिकवले जातात ."
आमचा बन्या हा मित्र असाच. बँकेत असताना सर्वजण त्याला टरकून असायचे. कारण त्याने सांगितलेले ऐकले नाही की त्याच्या आई बहिणीचा अस्सल कोल्हापुरी शिव्या हासडून उद्धार व्हायचा. मला त्याने सांगितले होते ,"बँकेत आलास की सरळ माझ्या काउंटरला ये. मी तुझे काम दोन मिनिटात करतो." "अरे बन्या गर्दी असते मधेच कसे घुसायचे?"त्यावर ,"अअरे तू नुसता काउंटर जवळ मला थोबडा दाखव, मी दोन मिनिटात हातातले काम आवरून तुझे काम करून दिल्याचे कारण. कोण तू मध्ये घुसलास म्हणून ओरडते बघतो." आणि खरेच तसं झालं ,दोन-तीन वेळेला," अहो मध्ये कुठे घुसता ?" असे मला म्हणल्यानंतर आतून नोटा मोजता मोजता बन्याने त्याची कानउघडणी स्वच्छ कोल्हापुरी शिवीने केली . "तो माझा मित्र आहे. तुम्हाला कुठे तक्रार करायची तिथे करा." त्याच्या शिव्यांचा दबदबा किती होता हे यावरून दिसते.
सध्या तरी निवडणुकांचा सीजन आहे .उमेदवार एकमेकाला शिव्यांची लाखोली वाहत आहेत. यावर वर्तमानपत्रातून अग्रलेख ही आले, पण कोल्हापुरी उमेदवारांवर त्याचा काही परिणाम नाही. हेच कशाला काही वर्षांपूर्वी कोल्हापूर महापालिकेत सर्वसाधारण सभेमध्ये कशावरून तरी बोलणाऱ्या महिलेला अडवले व तिने चक्क सभागृहात शिवी हासडली .त्यानंतर जवळपास वीस मिनिटे त्या महिलेने इतर नगरसेवकांना अस्सल कोल्हापुरी शिव्यांचा आहेर केला. काही महिला सदस्यांना इतके अपशब्द ऐकण्याची सवय नसल्यामुळे चक्क कानात बोटे घातली, तर काहींनी सभात्याग केला.
तरी अलीकडे सार्वजनिक नळ काढले आहेत. नाहीतर कोल्हापुरात पेठामधील सार्वजनिक नळावर महिलांचे जे गाली प्रदान व्हायचे, ते तास तासभर चालायचे व आमच्या लहानपणी ही गालिप्रदान महिलांनी केलेले आम्ही येथे ऐकलेले आहे. त्यामुळे आम्हाला याच महिला सदस्य महापालिकेत गेल्यावर त्यांनी गाली प्रदान करावे यात काही नवल वाटले नाही, उलट करमणूक झाली.
खणीवरील आमच्या सुभाष रावांना या शिव्यांची गंमत वाटून त्यांनी वेगळ्या शिव्या मोजायचे ठरवले. ही शिवी थोडी वेगळी होती. माहित आहेस शहाण्या xxx चा, किंवा या उलट माहित आहेस खुळ्या xxx चा आहेस. दोन्हीचा अर्थ एकच .असे जवळपास ९० वर वेगवेगळ्या फुल्या फुल्या फुल्यांचे प्रकार त्यांनी ऐकले होते . आमचा मित्र मल्लू पाटील हा बावड्यातील त्याच्या मित्रांनी दिलेल्या शिव्याबद्दल म्हणायचा ,"मला शिवीबद्दल काही म्हणायचे नाही पण स्त्रीलिंगी अवयवाची शिवी देताना ती नपुसकलिंग करून ते देतात याची खंत वाटते. तीच गोष्ट पुल्लिंगी लिंगविषयक शिवीची. इथेही पुल्लिंगाचे नपुसकलिंग करून हा बावडेकर मित्र शिव्या द्यायचा .आयला ही एक आफतच आहे." मल्लू म्हणायचा. म्हणजे शिव्या सुद्धा व्याकरण शुद्ध असाव्यात असा त्याचा आग्रह होता. एकदा साहित्यातील काही उल्लेख मल्लूने केले. कारण एका साहित्यिकाने कादंबरीमध्ये, तो गर्भगळीत झाला, असे वाक्य वापरले होते. त्याच साहित्यिकांने पुढे, ती गलितगात्र झाली, असा उल्लेख केला होता. यावर मल्लू म्हणाला," काय ही व्याकरण अशुद्धता. पुरुष गलितगात्र होतो व स्त्री गर्भगळीत होते एवढे साधे या साहित्यिकांना कसे कळत नाही.! आमचा दुसरा एक मित्र न थांबता सलग अर्धा तास शिव्यांची सरबत्ती करतो पण एक शिवी पुन्हा दुसऱ्यांदा उच्चारत नाही. ही अफाट कला आहे .
सातारा जिल्ह्यात कुठलेसे गाव आहे. तिथे रंगपंचमी दिवशी की होळी दिवशी सकाळी सगळी गावकरी मंडळी घाटावर जमतात व जवळपास अर्धा दिवस येथेच गाली प्रदान करतात. तीच गोष्ट पंजाब मध्ये होळीच्या दिवसांमधली. इथे क्रिकेटर मोहिंदर अमरनाथ यांचा एक किस्सा आठवला. मोहिंदर अमरनाथ मुळे व त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारताला पहिला विश्वचषक जिंकता आला .अर्थात संघाचे परिश्रम ही होते. पण या मोहिंदर अमरनाथला निवड समिती वारंवार संघाबाहेर काढायची. एकदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका सामन्यात, गोलंदाजाने चेंडू फेकल्यानंतर अमरनाथने तो बचावात्मक पद्धतीने खेळला. त्यावर त्याला चिडवण्यासाठी त्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने इंग्रजीमध्ये शिवी हासडली. मोहिंदर अमरनाथने सडेतोड पंजाबी शिवीने उत्तर दिले. ती पंजाबी शिवी कुणीतरी भाषांतर करून त्या गोलंदाजाला सांगितली .त्याने सामना समितीकडे तक्रार केली. समितीने मोहिंदरला बोलावून घेतले व विचारले," तू घाणेरडी शिवी का दिलीस?" त्यावर मोहिंदरचे उत्तर होते ,"त्याने इंग्रजीत शिवी दिली व मी प्रत्युत्तर म्हणून पंजाबी शिवी दिली. आता पंजाबी शिव्या झणझणीत असतात त्याला माझा नाईलाज आहे." सामना समितीने त्यावर पुढे काही कारवाई केली नाही. असे हे पंजाबी शिवीचे आंतरराष्ट्रीय उदाहरण. अशीच गोष्ट दिलीप वेंगसरकर यांनी कराची विमानतळावर उतरताना समोर जावेद मियादाद दिसल्यानंतर, त्याने मराठीत शिवी हासडली. त्यावर, जावेदला थोडेफार मराठी कळत असल्याने त्यांनेही गावरान हिंदीमध्ये त्याला प्रत्युत्तर दिल्याचे उदाहरण हेही सर्वश्रुत आहे.
.
गाण्याच्या क्षेत्रातील काही मंडळी भलतीच तिखट, त्याचे हे काही नमुने .पहिल्यांदा घेऊ ग्वाल्हेर घराण्याचे गायक रामकृष्ण बुवा वझे यांचे उदाहरण. कुमार गंधर्वांच्या गुरु असलेल्या अंजनी बाई मालपेकर यांनी ऐन उमेदीच्या वयात असताना काही कारणाने एका महाराजांचे सल्ल्यावरून गाणे सोडून दिले. त्यावर वझेबुवा म्हणाले," त्या रांडेच्याला काय जाते सांगायला गाणे गाऊ नको म्हणून. गाणे मिळवायला किती कष्ट करावे लागतात याची त्या लंगोटी वाल्या महाराजाला काय कल्पना?" हे झाले एक उदाहरण. दुसरे उदाहरण आहेत कुमार गंधर्व यांचे बालपणीचे असलेले तबलावादक मेहबूब खान यांचे. ते म्हणायचे," हा पोरगा एवढासा असल्यापासून मी त्याचे गाणे ऐकतो आहे. एखाद्याच्या अंगी गुणाचे कुस जरी असले तरी सोताच्या हाताने ***चे धोतर सोडून डोक्याला गुंडाळणारी आमची आवलाद." आणि तिसरे व शेवटचे उदाहरण जगन्नाथ बुवा पुरोहित यांचे. त्यांनी तयार केलेलाराग जोगकंस, ऐन तारुण्यात असलेल्या जितेंद्र अभिषेकीनी तानांचे सट्टे मारून पार बिघडवून टाकला. त्यानंतर जगन्नाथ बुवा रागाने बैठलीतून निघून गेले. नंतर ते निघून गेल्याचे कारण समजल्यावर अभिषेकी बुवा बुवांच्या घरी गेले व त्यांनी बुवांचे पाय धरले .त्यानंतर बुवांनी जवळपास अर्धा तास कृष्णाकाठच्या व अस्सल कोल्हापुरी शिव्यांनी जितेंद्रचा उद्धार केला, पण नंतर मात्र त्याची चिकाटी व आदर भाव पाहून बुवांनी आपली विद्या अभिषेकी बुवांना भरपूर स्वरूपात दिली. अशी ही गाण्यातील उदाहरणे.
आता मात्र थांबतो. कारण लेखाची लांबी खूप वाढल्याने काही वाचक तेही कोल्हापुरी, आपले मत व्यक्त करतील, च्यायला काय लांबड लावली आहे याने.
लेखक - प्रभाकर तांबट
Comments
Post a Comment